पुणे : आज पितृ दिवस सर्वत्र साजरा होत आहे. सगळे जण आपापल्या वडिलांबद्दल भरभरून बोलत आहेत. सोशल मीडियावर वडिलांचे फोटो सुद्धा टाकले जात आहेत. पण हे सर्व सुरु असताना पुण्यात मात्र माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. फादर्स डेच्या दिवशी जन्मदात्या बापाने आपल्या चिमुकलीला चाकूने चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या चार वर्षीय बालिकेवर बापाकडून अत्याचार झाल्याच्या या घटनेनं सर्व महाराष्ट्र हादरून गेला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी सुनील चौहान या आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 5 ते 14 जून दरम्यान घडली आहे. चार वर्षाची चिमुकली शाळेत सतत रडत असे. शिक्षिकेला मुलीच्या हातावर चटके दिल्याचे व्रण दिसून येत आहेत. शाळेत चिमुरडी रोज रडत असल्याने शिक्षिकेने तिला प्रेमाने जवळ घेत कारण विचारले असता तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सावत्र बापाकडून मुलीचा छळ
आरोपी सुनील चौहान हा चिमुकलीचा सावत्र बाप आहे. आई आणि सावत्र बाप दोघेही मजुरीचे काम करत होते. त्यामुळे सुरुवातीला आईने पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र सावत्र बाप वारंवार पीडितेचा छळ करत होता. त्यामुळे आईनेच पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी लहान मुलीशी अश्लील वर्तन करत होता. तसेच अनेक वेळा त्याने चाकू गरम करून तिला चटके सुद्धा दिलेले आहेत. असं फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.