पुणे : वराहपालन व्यवसायातील पैशांच्या वादातून सशस्त्र टोळक्याने सोमवारी (दि. ६) सकाळी रामटेकडी परिसरातील कुटुंबावर हल्ला केला. या घटनेत एका महिलेसह दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बसंतीकौर शामसिंग कल्याणी (वय ५०) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार संजूसिंग पंजाबसिंग कल्याणी याच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी संजूसिंग कल्याणी आणि बसंतीकौर नातेवाईक असून एकाच परिसरात वास्तव्याला आहेत. बसंतीकौर यांच्या मुलाने संजूसिंग कल्याणी याला वराह विक्री व्यवहारातील पैसे मागितले होते. त्यातून त्यांच्यात वादावादी झाली होती. त्यातून आरोपींनी तलवारी, कोयत्याने बसंतीकौर आणि त्यांच्या मुलावर हल्ला चढवला. बेकायदा जमाव जमवून दहशत माजविणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.