पिंपरी : इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा येथे पोहण्यासाठी उतरलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २) सायंकाळी घडली. साजिद शरीफ बागवान (वय २०, रा. निगडी), आतीक शरीफ बागवान (वय १५, रा. जळगाव) अशी बुडालेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी कुंडमळा येथे दोघेजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा या पथकांना पाचारण केले. पथकाने दीड तास शोध घेऊन दोन्ही मुलांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.