पुणे : कोर्टाचा अवमान करुन घर बळकावल्या प्रकरणी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंयज पिंगळ यांच्यासह बारा जणांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
माजी आमदार आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळ, अरुण भुजबळ(रा. फातिमानगर, वानवडी), विद्या अरुण भुजबळ व मुलगा, प्रशांत पवार, उमेश भुजबळ, सदानंद तेलगु व त्यांची मुलगी आणि जावई, कांताबाई बंडोबंत लांडगे, राजेंद्र बापुराव सुर्वे, तुकाराम किसण अगरकर, सपना घोरपडे, मनिषा गायकवाड व इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नानापेठ येथे राहणाऱ्या 67 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वानवडी येथील सर्वे नं. 84/1 येथे घर आहे. या घराचा वाद न्याय प्रविष्ठ आहे. दहा एप्रिल रोजी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळ यांच्यासह इतर आरोपींनी संगनमत करुन घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला.
आरोपींनी कोर्टाने दिलेल्या आदेशाचा अवमान केला. या प्रकरणी महिलेने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वानवडी पोलिसांनी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळ यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.