वाकड: पिंपरी-चिंचवड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिजोफेनिया या आजाराने ग्रस्त असलेल्या आईने आपल्या चार वर्षांच्या मुलाला घेऊन राहत्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवले आहे. वाकड परिसरात असलेल्या रीगालिया या सोसायटीमध्ये सकाळी ही घटना घडली आहे.
कोमल जगदीश हरिश्चंद्र (वय ३२, रा. रिगालिया, सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. कोमल यांनी आपला चार वर्षांचा मुलगा विहान संकेत आवटे याला कडेवर घेऊन इमारतीवरून उडी मारली. शनिवारी सकाळी साडे आठ वाजण्यापूर्वी ही घटना घडली आहे. कोमल यांच्यावर परदेशासह भारतात उपचार सुरू होते. या घटनेनंतर त्यांचे कुटुंबीय आणि शेजारी यांना जबरदस्त धक्का बसला असून, याबाबत सायंकाळी उशिरा पर्यंत अधिक माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.