संभाजीनगर : विकासकामांचा आढावा बैठक घेण्यासाठी संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार आले आहेत. या बैठकीला पीडब्ल्यूडी विभागाचे चीफ इंजिनियर न आल्याने अजित पवार यांनी सर्वांनाच झाप झाप झापले. संतप्त झालेले अजित पवार म्हणाले की, “आम्ही इथे माशा मारायला आलो आहोत का? चीफ इंजिनिअरना बैठकीला येण्यात काय अडचण होती? अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे का? मी असला निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, त्यांना तत्काळ बोलवून घ्या…” असे आदेश अजित पवार यांनी दिले.
अजित पवार यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करुन आढावा बैठकीला सुरुवात केली. मंत्री अतुल सावे आणि संदीपान भुमरे या बैठकीला उपस्थित आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी निधी खर्च झाला नसल्याने अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. पैसे मिळूनही निधी खर्च केला जात नसल्याबद्दल अजित पवार यांनी खंत व्यक्त केली. एका महिन्यात सगळा निधी खर्च करू नका, कामे व्यवस्थित करा, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या. पाणी पुरवठा व्यतिरिक्त अन्य कामे आचारसंहिता लागल्यावर थांबतील. प्रशासकीय मान्यता इतर मान्यता लवकर घ्या, निवडणुक आचारसंहिता पुर्वी कामे सुरु करा, असेही अजित पवार म्हणाले.
शाळेत विद्यार्थ्यांना चांगल्या वर्गखोल्या देऊ शकलो नाही, याबद्दल अजित पवार यांनी खंत व्यक्त केली. शाळा खोली बांधण्यासाठी दानशूर व्यक्ती, सीएसआरची मदत घ्या, असा सल्ला अजित पवारांनी दिला. पालकमंत्री यांना डीव्ही कारसाठी इनोव्हा क्रिस्ट गाडी घ्यायला निधी दिला, असे अजित पवार म्हणाले. त्यावर संदीपान भुमरे म्हणाले की, ‘गाडी आली मात्र मला माहिती नाही, मला अधिकाऱ्यांनी सांगितलचं नाही.’
पडेगाव पोलिस फायरिंग रेंज व वन विभाग यांची जागा संयुक्त मोजणी करुन हद्दी कायम कराव्यात, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना आदेश दिले. अजित पवार संतापले, त्यांनी अधिकाऱ्यांना झापले. संभाजीनगर येथील नियोजन समिती सभागृहाची दुरावस्था, काही ठिकाणी फर्निचर तुटलेले आहे. तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.