लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील महादेव मंदिरालगत असलेल्या रस्त्यावर तरससदृश जंगली प्राणी वावरतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. यामुळे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर गावातील महादेव मंदिराजवळून एक रस्ता इनामदार वस्तीच्या दिशेने जातो. दरम्यान, शनिवारी (ता.१३) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तेथील नागरिकांना कुत्री भुंकल्याचा आवाज ऐकू आला. नागरिकांनी बाहेर येऊन पाहिले असता, त्यांना तरससदृश प्राणी आढळून आला.
दरम्यान, नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले असता त्यांना कॅमेरात तरस प्राणी असल्याचे आढळून आले. तर याचा व्हिडिओ लोणी काळभोरसह परिसरात तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तरस भारतात कुठं आढळतो?
तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे. हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळतो. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला ‘लाफिंग ॲनिमल’ (हसणारा प्राणी) असेही म्हणतात. तरस मांसभक्षक असतो. पट्टेरी तरस भारत, नेपाळ, पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देश व उत्तर आफ्रिका, केन्या, टांझानिया, अरबी द्वीपकल्पात आढळतात. भारतात उत्तर भारत, मध्य प्रदेशात तरस सापडतात.
View this post on Instagram
तरसच्या पिलांचे डोळे जन्मत: असतात बंद
हिवाळा याचा मिलनऋतू असतो. पिलांचा जन्म उन्हाळ्यात होतो. तरसाला एका वेळेस तीन ते चार पिलं होतात. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. पिलं लहान असतानादेखील त्यांच्या अंगावर आडवे पट्टे असतात. शरीरावर पांढरट मऊ केस असतात. परंतु मानेवर पूर्ण वाढलेल्या तरसासारखे आयाळीचे केस नसतात. भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एक स्वच्छता कर्मचारी म्हणून तरस करतो काम
लोणी काळभोरच्या चारही बाजूंनी वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात अनेक प्राणी राहतात. त्यातीलच एक तरस नावाचा प्राणी नागरिकांना आढळला आहे. तरस हा श्वान प्रकारातील प्राणी आहे. मृत प्राणी आणि शिळे अन्न खाऊन तो जीवन जगत असतो. तो एक स्वच्छता कर्मचारी म्हणून निसर्गात काम करत असतो. हा वन्यजीव सहसा माणसावर हल्ला करत नाहीत. माणसापासून सुरक्षित अंतर पाळत असतात. माणूस त्यांच्याजवळ आला तर ते स्वरक्षणासाठी हल्ला करतात.
– मंगेश सपकाळे, वन परिमंडळ अधिकारी, लोणी काळभोर.