अमोल दरेकर
सणसवाडी: राज्यात सर्वत्र उत्सवाचा आनंद असताना दूध उत्पादक मात्र धास्तावले आहेत. गेल्या सहा महिन्यांत दुधाचे दर जवळपास दहा रुपयांनी घसरल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रात यंदा दुष्काळामुळे गंभीर परिस्थिती आहे, तर दुसरीकडे पशुखाद्याचे दरही 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, दुधाचे दर घसरल्याचा मोठा आर्थिक फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या दुधाचा खरेदी दर 27 ते 28 रुपयांपर्यंत खाली आला आहे. शेतीमालाला चांगला बाजार भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसाने काही प्रमाणात पीक लागवड झाली होती, त्याचेही नुकसान मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने यामध्ये लक्ष घालून ४० रुपये दुधाला दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. संकट काळात बळीराजाच्या पाठीशी सरकार उभे राहते का? हा प्रश्न आहे.
” वाढते पशुखाद्य दर, दुष्काळ हे दुहेरी संकट आल्याने सध्या लिटर मागे ५ ते ६ रुपयांचा तोटा दूध उत्पादकाला सहन करावा लागत आहे. परंतु, राजकीय नेते मंडळी वेगवेगळ्या कार्यक्रमात व्यस्त आहे. त्यांनी त्वरित यामध्ये लक्ष घालून दुधाला ४० रुपये दर द्यावा. अन्यथा सर्व दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरू. ”
– प्रकाश पवार, माजी सभापती. शिरूर मार्केट कमिटी