पुणे प्राईम न्यूज: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीवरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. आता शाळाही कंत्राटी पद्धतीने चालवायला दिल्या जात आहेत. ज्यांना शाळा दत्तक दिली जात आहे, ते लोक शाळांचा वापर कशाही पद्धतीने करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. शरद पवार हे आज अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका सहकार मेळाव्याला संबोधित केले. या सभेला संबोधित करत असताना शरद पवार यांनी ही टीका केली.
महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळा खासगी कंपन्यांना दत्तक म्हणून द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ती कंपनी, कंपनीचे मालक शाळेच्या कामात पाहिजे तेव्हा हस्तक्षेप करतात. शाळेचा वैयक्तिक कामासाठी उपयोग करून घेतात, अशी शंका आली तर त्यात चुकीचं काही नाही”, अशा शब्दांत पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, उदाहरण म्हणून खासदार शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेला एक प्रसंग सांगितला. “नाशिकमध्ये एक शाळा आहे. नाशिकमध्ये द्राक्षाचं मोठं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.द्राक्षांपासून तिथे दारूही तयार केली जाते. राज्य सरकारने दारू तयार करणाऱ्या एका कारखान्याला एक सरकारी शाळा दत्तक म्हणून दिली आहे. ती शाळा कशी चालत आहे, याची मी माहिती घेतली. पण, त्यावेळी मला असं कळलं की, ज्यांना ही शाळा चालवायला दिली आहे, त्यांनी गेल्या महिन्यात त्या शाळेत एक कार्यक्रम घेतला ”, असं शरद पवार म्हणाले.
“तो कार्यक्रम कुणाचा होता? तुम्हाला नाव माहिती आहे की नाही? याची मला कल्पना नाही. गौतमी पाटील. नाव ऐकलंय का? गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम त्या शाळेत ठेवला. आता मला तुम्ही सांगा, मुलांना काय शिकवायचं? गौतमीचा धडा शिकवायचा का? आपण काय करतोय? कशा पद्धतीने करतोय? कुणासाठी करतोय? आपण मुलांवर काय संस्कार करतोय? याचा विचार त्यांच्या मनात येत नाही. थेट खासगीकरण केलं आहे”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
भाऊराव पाटील आणि पंजाबराव देशमुखांनी शैक्षणिक संस्था निर्माण करून एक वेगळं चित्र निर्माण केलं. आणि आज गौतमी पाटील हिला नृत्यासाठी बोलावणारे आणि शाळा चालवणारे कुठे? याचा विचार केला पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले.