योगेश पडवळ
पाबळ, (पुणे) : महिलांच्या आरोग्यसेवा आणि स्वच्छतेची गरज फार मोठ्या प्रमाणावर आहे. मासिक पाळीतील स्वच्छता, प्रजननातील आरोग्य सेवा, पोषण, मानसिक आरोग्य आणि आरोग्य शिक्षण यासारख्या समस्यांचे निराकरण होणे गरजेचे असून महिलांसाठी निरोगी वातावरण असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन सामाजीक कार्यकर्त्या पुनम फलके यांनी मांडले.
पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर शिक्षण संस्था संचलित, दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात आरोग्य विभाग, विशाखा समिती व ताराबाई महिला मंच या तीन विभागाच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुनम फलके बोलत होत्या.
यावेळी सुप्रिया जाधव, भीमाशंकर शिक्षण संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी बी. डी. चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. शत्रुघ्न थोरात, आरोग्य विभाग प्रमुख कुणाल वळसे, विशाखा समिती प्रमुख प्रगती भागवत, ताराबाई महिला मंच प्रमुख सुप्रिया तिवाटणे सर्व विद्यार्थिनी, महिला प्राध्यापक उपस्थित होते.
यापुढे बोलताना फलके म्हणाल्या, “बदलत्या जीवनशैली व धावपळीचे जीवन यामुळे महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचा खूप गंभीर परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. महिलांचा सर्वात मोठा विषय म्हणजे मासिक पाळी त्यात होणारा त्रास, मासिक पाळीत घेण्यात येणारी काळजी महत्वाची आहे. त्यातून मासिक पाळीत वापरले जाणारे पॅड हे प्लास्टिक पासून बनवलेले असतील तर ते आपल्याला कॅन्सर पर्यंत नेऊ शकतात.
दरम्यान, पर्यावरण पूरक साधनांचा वापरण्याविषयी जागरूक राहण्याचे आवाहन करून फलके यांनी आपल्या शिबिरात प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवून दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगती भागवत यांनी केले. सूत्रसंचालन संजीवनी टाके यांनी केले. तर आभार दिपाली बोंबले यांनी मानले.