जीवन सोनवणे
Shirwal News : खंडाळा : शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असलेल्या २६ वर्षीय युवकाला शिरवळ पोलीस ठाण्याकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करून, उपविभागीय अधिकारी वाई यांनी सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील भोर व पुरंदर या दोन तालुक्यांतून दोन वर्षे कालावधीसाठी हद्दपार केले आहे.
सातारा येथील पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशानुसार शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.(Shirwal News ) त्यानुसार शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत दहशत माजवित विनयभंग, अॅट्रॉसिटी व मारामारीचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ भैय्या कैलास शिरतोडे (वय २६, मंडई कॉलनी, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) याचा सातारा जिल्हा व पुणे जिल्ह्यातील भोर व पुरंदर या दोन तालुक्यांतून हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी उपविभागीय अधिकारी वाई उपविभाग राजेंद्र जाधव यांच्याकडे दाखल केला होता.
दरम्यान, वाई उपविभागासमोर सुनावणी करत, शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत विविध गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ भैय्या कैलास शिरतोडे याला उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सातारा व पुणे जिल्हयातील भोर व पुरंदर या दोन तालुक्यांतून दोन वर्षे कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापू बांगर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस यांच्या आदेशानुसार शिरवळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक नवनाथ मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, शंकर पांगारे, वृषाली देसाई, अब्दुल बिद्री, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, तुषार कुंभार, प्रशांत धुमाळ, सुनिल मोहरे, मंगेश मोझर, अजित बोराटे यांनी केली आहे.
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार
आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, इद-ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना दहशतमुक्त वातावरण रहावे, यासाठी शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २१ जणांविरुद्ध हद्दपारीची कार्यवाही सुरु आहे. सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेऊन, प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. (Shirwal News ) सणा-सुदीच्या काळात महिलांना सुरक्षित वातावरणात वावरता यावे, यासाठी शिरवळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पेट्रोलींग पथक तयार करण्यात आले आहे. तसेच वाहतूक व्यवस्था, रहदारी सुरळीत राहावी यासाठी बेशिस्त वाहनधारकांवर अधिक प्रभावीपणे अंमलबजाणी करुन, कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी दिली. सर्व नागरिकांनी याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Satara News : सातारा जिल्ह्यात मद्य विक्रीस बंदी; गणेश चतुर्थीनिमित्त प्रशासनाचा निर्णय
Satara News : खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..
Pune News : गावठी दारू अड्ड्यावर छापा; तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल नष्ट; शिरगाव पोलिसांची कारवाई