शुभम वाकचौरे
Shirur News : जांबूत, (शिरूर) : शिरूर तालुक्यातील जांबूत येथील निवृत्त माजी सैनिक श्रीराम दादाभाऊ गोरडे यांची कर सहाय्यक या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीने परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
तरूणाईचा हा आदर्श उल्लेखनिय…
सैनिकांमध्ये असणारी सेवाभावी वृत्ती, अथक परिश्रम,संघर्ष करण्याची तयारी असते. त्यातून चिकाटी व अथक परीश्रमात १७ वर्षे देशाची सेवा केली. देशसेवेतून निवृत्ती घेतल्या नंतर देखील संघर्ष सुरू ठेवला. त्यातून स्पर्धा परिक्षेला सामोरे जात अभ्यासू वृत्तीने त्यानी यशाला गवासनी घातली आहे.
जनतेची सेवा करण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय सैन्य दलात जाण्याच्या निर्णयाचे सर्व कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. खूप परिश्रम केल्यानंतर सन २००५ मध्ये श्रीराम गोरडे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली. त्यानंतर सतरा वर्ष देश सेवा करून निवृत्त झाल्यानंतर अजून काही तरी करावे. हा हेतू घेऊन पुन्हा जनतेची सेवा करण्यासाठी ते स्पर्धा परिक्षा देऊ लागले.
“महाराष्ट्र लोकसेवा आयोग”च्या परिक्षेला सामोरे जाण्याचे ठरविले. सरळ सेवांच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षांना सामोरे गेले त्यात त्यांना यश मिळत गेले. त्यामध्ये अहमदनगर पोलीस, मंत्रालय क्लार्क, PCMC क्लार्क, यामध्येही त्यांनी यश संपादन केले. यावर समाधान न मानता त्यांनी प्रयत्न चालूच ठेवले. १४ सप्टेंबर २०२३ रोजी कर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत कर सहाय्यक या पदासाठी त्यांनी परिक्षा दिली. परीक्षेचा निकाल लागून त्यांची निवड कर सहाय्यक म्हणून झाली आहे. त्यांच्या या निवडीने जांबूत ग्रामस्थ व ओम साई मित्र मंडळ यांच्या वतीने श्रीराम गोरडे यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी सरपंच दत्तात्रय जोरी, माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया, माजी सरपंच बाळकृष्ण कड, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, सुभाष जगताप, माजी चेअरमन नाथा जोरी, कारभारी थोरात, मिलिंद थोरात, दादाभाऊ गोरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
जांबूत येथील सरपंच दत्तात्रेय जोरी म्हणाले, “सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करणे ही सगळ्यात महत्वाची देशसेवा आहे. तेवढ्यावर न थांबता पुन्हा स्पर्धा परिक्षेला सामोरे जाऊन यश मिळविणे हा तरूणापुढे आदर्श आहे. तरूणांनी देखील देशसेवेसाठी पुढाकार घ्यावा.”
पंचायत समितीचे माजी सदस्य वासुदेव जोरी म्हणाले, “देशाच्या सिमांचे रक्षण करणाऱ्या बहाद्दर सैनिकांचा आपुलकीने सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, या सैनिकांचा आम्हाला गर्व नक्कीच आहे. त्यातून स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होणे यामुळे या माजी सैनीकाचा आम्हाला गर्व आहे. तरूणाईचा हा आदर्श उल्लेखनिय आहे.”