पुणे: राज्यात परतीच्या (Weather Alert) पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून, पुढील 3 ते 4 दिवसांत मान्सून राज्याच्या काही भागातून निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. मुंबई आणि पुणे येथून मान्सून परतण्याची सामान्य तारीख अनुक्रमे ८ आणि ९ ऑक्टोबर असण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वी आज मंगळवार, 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

आजच्या हवामानाचा अंदाज (7 ऑक्टोबर):

- कोकण आणि गोवा: या भागात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा (Thunderstorm and Squall) इशारा देण्यात आला आहे.
- मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा: येथे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- विदर्भ: विदर्भात आज हवामान साधारणपणे कोरडे राहण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळ ‘शक्ती’चा प्रभाव कमी
अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) चक्रीवादळाची तीव्रता आज 7 ऑक्टोबरपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ भारताच्या किनारपट्टीपासून दूर जात असल्याने महाराष्ट्राला त्याचा थेट धोका नाही, परंतु यापूर्वी शक्तीमुळे किनारपट्टीवर वादळी वारे आणि समुद्रात खवळलेले वातावरण होते. मच्छिमारांना आजही अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पुढील काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रातून माघार घेण्यास सुरुवात करेल. मात्र, आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे.







