Maharashtra Weather: महाराष्ट्रात सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून आज, 17 एप्रिल रोजी राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः अकोला, सोलापूर आणि जळगाव यांसारख्या शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला असून नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोकण किनारपट्टीवर तापमानाचा पारा जरी 35 अंशांच्या आसपास असला तरी हवेतील आर्द्रतेमुळे प्रचंड उकाडा आणि दमट हवामान जाणवत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने उष्ण आणि दमट हवामानाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होत असून घामामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सायंकाळपर्यंत हा उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या भागांत तापमानात वाढ झाली असली तरी, काही ठिकाणी सायंकाळच्या वेळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, हा दिलासा तात्पुरता असून उष्णतेची तीव्रता कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मराठवाड्यातही छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
येत्या 18 एप्रिलपासून राज्याच्या काही भागांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पावसाच्या या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






