पुणे: फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डे’ सेल (Flipkart Big Billion Days Sale) मध्ये आयफोन 16 खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हजारो ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. आकर्षक किमतीत आयफोन (iPhone 16) मिळत असल्याने ग्राहकांनी उत्साहात ऑर्डर केला, पण पेमेंट पूर्ण झाल्यानंतरही ऑर्डर अचानक रद्द झाल्याने कंपनीवर ‘घोटाळ्या’चा (Big Billion Scam) आरोप केला जात आहे.

या सेलमध्ये आयफोन 16 (128GB) फक्त ₹51,999 आणि आयफोन 16 प्रो (128GB) ₹69,999 मध्ये उपलब्ध असल्याचे जाहीर करण्यात आले होते. 22 सप्टेंबर रोजी सेल सुरू होताच, अनेक ग्राहकांनी मध्यरात्रीच ऑर्डर देऊन पेमेंट केले. ऑर्डर यशस्वी झाल्याचे कन्फर्मेशन मिळाल्यानंतरही काही तासांनी फ्लिपकार्टने कोणतीही सूचना न देता ऑर्डर्स रद्द केल्या.
येथे पाहा पोस्ट:
Flipkart, I’m so angry about your false advertising. Your Big Billion Days sale is a total scam. It’s shameful how you trick customers like this. Neither the iPhone 16 nor the Pixel 9 have gone down in price at all. Why lie to people with fake ads? pic.twitter.com/UQrcD6ZPvy
— Mubba_m2 (@MubbaM2) September 22, 2025
या प्रकारानंतर ग्राहकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अनेक वापरकर्त्यांनी ‘हा एक घोटाळाच आहे,’ असा आरोप केला आहे. काही ग्राहकांनी, “ऑर्डर यशस्वी झाल्या होत्या, पण सकाळी कोणतंही कारण न देता त्या रद्द केल्या गेल्या,” असे म्हटले आहे.
विशेष म्हणजे, हा अनुभव केवळ आयफोन खरेदी करणाऱ्यांनाच आलेला नाही. गुगल पिक्सेल 9 (Google Pixel 9) आणि नथिंग फोन 3 (Nothing Phone 3) सारख्या मॉडेल्ससाठीही घेतलेल्या ऑर्डर्स रद्द झाल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
या सर्व वादामुळे कंपनीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फ्लिपकार्टकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हा सेल खरोखरच ग्राहकांसाठी ऑफर्स देण्यासाठी होता, की फक्त वेबसाइटवर गर्दी वाढवण्यासाठी, असा सवाल आता उपस्थित होत आहे.







