सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील २७ वर्षीय युवा डॉक्टर राजेंद्र जगन्नाथ रुपनवर यांच्या मृत्यूप्रकरणी वातावरण चांगलेच तापले आहे. वरिष्ठांकडून होणाऱ्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून डॉक्टर रुपनवर यांनी जीवन संपवल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात माजी मंत्री तानाजी सावंत यांचे ओएसडी देशमुख यांचे नाव चर्चेत आल्याने त्यांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दोषींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.

डॉक्टर रुपनवर यांचा मृतदेह बुधवारी मुंबईहून फलटण येथे आणण्यात आला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर शेकडो नागरिक आणि नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली. यावेळी कुटुंबीय आणि रुग्णालय प्रशासनामध्ये वाद झाला. संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली.

राजेंद्र यांनी अत्यंत मेहनतीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. हा त्रास असह्य झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कारवाई होईपर्यंत पार्थिव स्वीकारणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी लीला मदने यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत दाखल झालेला गुन्हा पुढील तपासासाठी फलटण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
राजेंद्र यांनी मृत्यूपूर्वी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनेक व्यक्तींची नावे घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दाखल एफआयआरमध्ये सध्या केवळ लीला मदने यांचे नाव असल्याने पोलिसांच्या तपासावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
याप्रकरणी डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांनी कायदेशीर प्रक्रिया कुटुंबीयांना समजावून सांगण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तसेच तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टर रुपनवर यांच्या मृत्यूमागील नेमकी कारणे आणि इतर व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.







