पुणे: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बीड–पुणे रेल्वे सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत येत्या १७ सप्टेंबर रोजी ही रेल्वे सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रेल्वेमार्गासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

अहिल्यानगर–बीड–परळी रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच बीड–पुणे आणि बीड–मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

बैठकीत बीड–पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. तांत्रिक तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्याने १७ सप्टेंबरला रेल्वे सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रेल्वे कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा करणाऱ्या बीडकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बीड–मुंबई म्हणजेच पनवेल रेल्वे सेवा सुरू करण्यासाठीही प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबरअखेर ही सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रेल्वेसेवा सुरू झाल्यास बीडसह मराठवाड्यातील नागरिकांना मुंबई आणि पुण्याशी थेट संपर्क मिळणार आहे.
बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवा १७ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू करण्यात आली होती. यामुळे बीडकरांची अनेक दशकांची प्रतीक्षा संपली होती. आता त्याच ऐतिहासिक दिवशी बीड–पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याने या सेवेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बीड–पुणे रेल्वेमुळे शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि प्रवासासाठी पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच मराठवाड्यातील औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही या रेल्वे कनेक्टिव्हिटीचा फायदा होऊ शकतो. पुढील काळात बीड–मुंबई रेल्वे सेवा सुरू झाल्यास जिल्ह्याला राज्यातील प्रमुख शहरांशी अधिक चांगली जोडणी मिळणार आहे.







