सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात किरकोळ वादातून 27 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह शेतातील विहिरीत फेकून दिला. या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

मृत तरुणाचे नाव सागर श्रीशैल व्हनचेंजे असून तो अक्कलकोट तालुक्यातील दहीटणेवाडी येथील रहिवासी होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट 2026 रोजी रात्री अक्कलकोटमधील कारंजा चौक परिसरात सागरचा श्रुती यारोळे, नागनाथ बनसोडे आणि बाळू शिंदे यांच्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर सागर बेपत्ता झाला.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट रोजी पहाटे तिघांनी सागरला जुना किणी रोड परिसरातील शेतात नेले. तेथे त्याला दारू पाजण्यात आली. त्यानंतर नागनाथ बनसोडे याने सागरचे हात पकडले, तर बाळू शिंदे याने त्याचे पाय धरून ठेवले. यावेळी श्रुती यारोळे हिने मोठ्या दगडाने त्याच्या डोक्यावर आणि कपाळ ठेचल्याचा आरोप आहे. यात सागरचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह अमर गौरीशंकर भरमशेट्टी यांच्या शेतातील विहिरीत टाकल्याचे पोलिस तपासात समोर आले.

दरम्यान, 6 ऑगस्ट रोजी निजाम वजीर खिस्तके यांनी विहिरीत मृतदेह दिसत असल्याची माहिती पोलिसांना दिली. अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी श्रुती विजय यारोळे, नागनाथ दत्ता बनसोडे आणि बाळू शिंदे यांच्याविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.







