सांगली : सांगलीच्या खानापूर तालुक्यातील रेणावी येथे दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार दोन ते तीन जणांचा मृत्यू झाला असून १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

रेणावी घाटातील तीव्र वळणावर गुरुवारी हा अपघात झाला. विट्याहून आटपाडी घाटाच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि विजापूरहून मेढा (जि. सातारा) येथे जाणारी एसटी बस यांची समोरासमोर धडक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने दोन्ही बसची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातातील मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा तसेच त्यांची ओळख याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचे पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.







