करमाळा: देलवडी (ता. करमाळा) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने तीन ते चार नागरिकांवर जीवघेणा हल्ला करत चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कुत्र्याने केवळ नागरिकांवरच नव्हे, तर काही शेतकऱ्यांच्या जनावरांवरही हल्ला चढवून चावा घेतल्याची माहिती आहे.

हल्ल्यात गौरव जवंजाळ (वय १३), बापू मोरे (वय ५५), सरिता निकत (45), अशोक चव्हाण (37) आणि आणखी काही नागरिक जखमी झाले आहेत. यातील काही जखमींना गंभीर अवस्थेत सोलापूर येथे तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले असून काहीजण राशीन येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या कुत्र्याने शेतकऱ्यांच्या १० पाळीव जनावरांवरही हल्ला केला आहे.

देलवडी व परिसरात सध्या पिसाळलेले मोकाट कुत्रे फिरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान, नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








