सातारा: सातारा जिल्ह्यातील फलटण (Faltan Doctor News) शहर पोलीस ठाण्यात दाखल (Satara News) झालेल्या अत्यंत संवेदनशील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना पोलीस विभागामार्फत जारी करण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार, संबंधित प्रकरणातील पिडीत व्यक्तीची ओळख उघड होईल अशी कोणतीही माहिती, छायाचित्रे किंवा तपशील माध्यमांमधून प्रसारित अथवा प्रसिद्ध न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 345/2025 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) इत्यादी प्रमाणे दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी दाखल झाला आहे. या प्रकरणात गोपाळ बाळासाहेब बदने, पोलीस उपनिरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे आणि प्रशांत किसन बनकर (वय 29, रा. फलटण) हे आरोपी असून या घटनेत एक महिला मृत पिडीत आहे.
सदर गुन्हा अत्यंत संवेदनशील स्वरूपाचा असल्याने माध्यमांनी जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने बातमीकरण करावे, अशी सूचना पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासाची प्रक्रिया सुरू असून तपासास बाधा निर्माण करणारी, तथ्यहीन किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पिडीत महिला किंवा संबंधित कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्यहनन होईल, अथवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल संशय निर्माण होईल अशी माहिती प्रसिद्ध न करण्याची सूचना देण्यात आली आहे.
महिलांवरील अत्याचारासंदर्भातील कोणतीही बातमी, दृश्य किंवा माहिती कायद्याच्या चौकटीत राहूनच प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा प्रकारचे प्रसारण भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 72 (म्हणजेच IPC 228-A), भारतीय राज्यघटनेचे कलम 21 तसेच *The Digital Personal Data Protection Act 2023* मधील तरतुदींचे उल्लंघन ठरू शकते. अशा प्रकरणात संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची जाणीव माध्यमांनी ठेवावी, असे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी कळविले आहे.
या सूचनांमुळे पोलिसांनी तपासाची गोपनीयता आणि पिडीत व्यक्तीच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली असल्याचे स्पष्ट होत आहे.







