सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अनधिकृत पुतळ्यांच्या वाढत्या (Solapur News) प्रकारावर प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. आता गावात उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत पुतळ्यांची माहिती वेळेत न दिल्यास थेट कारवाई होणार आहे. (Latest Marathi News)

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी संयुक्त परिपत्रक काढून स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, गावात कोणताही अनधिकृत पुतळा, स्मारक किंवा ध्वजस्तंभ उभारला जात असल्याची माहिती पोलिस पाटलांनी तात्काळ पोलिस आणि महसूल प्रशासनाला देणे बंधनकारक आहे.
जर पोलिस पाटील ही माहिती देण्यात अपयशी ठरले, तर त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे. त्यांना अल्प मुदत देऊन स्पष्टीकरण मागवले जाईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
यासोबतच ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनाही जबाबदार धरण्यात आले आहे. अनधिकृत पुतळ्याची माहिती न दिल्यास संबंधित सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करून पुढील कारवाईसाठी पाठवला जाईल.
प्रशासनाच्या मते, परवानगीशिवाय उभारले जाणारे पुतळे भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात. तसेच अशा प्रकारांमुळे गावांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे.
म्हणूनच आता गावातील स्थानिक पदाधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, नियमांचे पालन न केल्यास पदावर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.







