पंढरपूर : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असताना पंढरपूरमध्ये एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूर शहरात घडलेल्या या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वैष्णवी भागवत असे या पीडित तरुणीचे नाव असून अज्ञात इसमाने तिच्या अंगावर ॲसिडसदृश द्रव फेकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.
विशेष म्हणजे, या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा सुरू असताना शहरातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही या घटनेने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीडित तरुणीच्या आईने सांगितले की, “आम्हाला एक फोन आला. त्यानंतर आम्ही पेट्रोल पंपाजवळ पोहोचलो. तिथे माझ्या मुलीवर ॲसिड टाकल्याचे समजले. माझ्या मुलीसारखे कोणावरही असे करू नका,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.







