सातारा : फलटण शहरात अल्पवयीन मुलीला भूतबाधा झाल्याचे सांगून तिच्या कुटुंबीयांची दिशाभूल केल्याचा आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सौरभ नाना मदने (वय 25, रा. बुधवार पेठ, फलटण) याच्याविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्यासह जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताची पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी आधीपासून ओळख होती. मुलीच्या अंगात भूत असल्याचे सांगून त्याने कुटुंबीयांचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. त्यानंतर भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली त्याने जादूटोणा केल्याचे भासवले.

या प्रकारानंतर जुलै आणि ऑगस्ट 2027 मध्ये संशयित मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने घेऊन जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशाच एका वेळी त्याने तिला एका जुन्या घरात नेल्याचा आरोप आहे. तेथे तिला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना इजा करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

या घटनेनंतर मुलगी भीती आणि मानसिक तणावामुळे घरातून निघून वाई येथे गेल्याची माहिती आहे. कुटुंबीयांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तातडीने फलटण पोलिसांशी संपर्क साधला.
त्यानंतर पोलिसांनी सौरभ मदने याच्याविरोधात पोक्सोसह जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास फलटण शहर पोलीस करीत आहेत.







