अमरावती: अमरावती (Crime News) शहरात 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या नीलिमा उर्फ पिंकी खरबडे (45) यांच्या हत्येचा गुंता आता सुटला आहे. नीलिमा यांची हत्या त्यांच्या दुसऱ्या पतीनेच केल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

नीलिमा यांनी सनी उर्फ नितीन इंगोले याच्यासोबत दोन महिन्यांपूर्वीच दुसरा विवाह केला होता. सनी भूजल सर्वेक्षण विभागात कार्यरत असल्याने, दुसऱ्या लग्नामुळे त्याची शासकीय नोकरी अडचणीत येऊ शकते अशी भीती त्याला वाटत होती. नीलिमा या परिस्थितीचा फायदा घेत होती; ती सनीला सतत पैशांची मागणी करत होती. नीलिमाच्या अशा वागण्याने तो कंटाळला होता. यापूर्वी नीलिमाने त्याच्याविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती, ज्यामुळे त्यांच्या नात्यातील तणाव आणखी वाढला होता. याच कारणामुळे सनीने नीलिमाची हत्या केली.
सनीने घटनेच्या दिवशी घरी कोणी नसतांना दोघांनी मद्यपान केले. सनीने नीलिमा झोपली असतांना संधी साधून डोके वरवंट्याने ठेचून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सनीने जोरदार हल्ला केल्यानंतर नीलिमा जोरात किंचाळली त्याने लगेच तिच्या मानेवर सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली.
या खुनानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी, सनीने नीलिमाचा मोबाइल, सीसीटीव्ही डीव्हीआर आणि खुनासाठी वापरलेले साहित्य नाल्यात फेकून दिले. मात्र पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासणीत घटनेच्या दिवशी त्यांचे मोबाईल लोकेशन नीलिमाच्या घराच्या परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सनीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.







