मुंबई: सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर (Pension Scheme) मिळणाऱ्या पेन्शनसाठी वेळोवेळी काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये जीवन प्रमाणपत्र हा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे. पेन्शनधारक जिवंत आहेत आणि त्यांचे पेन्शन योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे याची खात्री करण्यासाठी दरवर्षी हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. यासाठी निश्चित कालावधी ठेवण्यात येतो. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर होती. या तारखेपर्यंत प्रमाणपत्र दिले नाही तर पुढील महिन्याचे पेन्शन थांबू शकते. त्यामुळे अनेकांच्या पेन्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पारंपारिक पद्धतीनुसार लोक बँकेत जाऊन फॉर्म भरतात आणि प्रमाणपत्र देतात. पण हा एकमेव मार्ग नाही. सध्याच्या डिजिटल सुविधेमुळे हा प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा प्रवास करू न शकणाऱ्यांसाठी ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सोय उपलब्ध आहे. आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारेदेखील हे प्रमाणपत्र काही मिनिटांत पाठवता येते. यासाठी फक्त मोबाईल फोन, आधार क्रमांक आणि इंटरनेट आवश्यक आहे.
जीवन प्रमाण अॅपद्वारेही जीवन प्रमाणपत्र सादर करता येते. या अॅपमधून आधार माहिती आणि चेहरा पडताळणी करून प्रमाणपत्र तयार होते. तसेच गतिशीलतेच्या अडचणी असलेल्या नागरिकांसाठी डोअरस्टेप बँकिंगचीही सुविधा आहे. अनेक बँका आणि इंडिया पोस्टचा कर्मचारी घरी येऊन फॉर्म भरून घेतात आणि पडताळणी करतात.
जर एखाद्या पेन्शनधारकाचे पेन्शन वेळेवर प्रमाणपत्र न दिल्याने रोखले गेले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. जीवन प्रमाणपत्र सादर होताच पेन्शन पुन्हा सुरू होते. मात्र यासाठी काही दिवस लागू शकतात. म्हणून पेन्शनमध्ये अडथळा येऊ नये यासाठी जीवन प्रमाणपत्र वेळेत सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.







