संगमनेर: भीतीचा फायदा घेऊन ‘भोंदूगिरी’ कशी फोफावते, याचे संतापजनक उदाहरण अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात समोर आले आहे. वडगावपान येथील ‘दत्तधाम’ आश्रमात स्वतःला ‘गडगे महाराज’ म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीने दैवी शक्तीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली आहे.

स्वतःला दत्तगुरूंचा अवतार समजणारा हा तथाकथित महाराज कॅन्सरसारखे दुर्धर आजार केवळ मंत्रोच्चाराने बरे करतो, असा दावा करत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मते, हा भोंदूबाबा पूजेच्या आणि इलाजाच्या नावाखाली लोकांकडून 11 हजार ते 52 हजार रुपयांपर्यंत अवाढव्य रकमा उकळत होता.
कॅन्सरसारख्या आजारात वेळेवर उपचार मिळणे गरजेचे असते. अशा भोंदूगिरीच्या नादात रुग्ण वैद्यकीय ट्रीटमेंट सोडून देतो, ज्यामुळे त्याचा जीव जाऊ शकतो. दरम्यान, सोशल मीडियावर अनेकांनी कारवाईची मागणी केली आहे.






