भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील येवई नाका येथे साडेआठ कोटी रुपये किमतीचा माल घेऊन जाणारा कंटेनर लुटल्याची घटना समोर आली होती. कंटेनर चालकाने चोरट्यांनी मारहाण करून आपले अपहरण केले आणि माल लुटून नेल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. तक्रारदार कंटेनर चालकच या कथित दरोड्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघड झाले. भिवंडी तालुका पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक करून सुमारे साडेआठ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा आणि गुरुग्राम येथून पतंजली ट्रान्सपोर्टच्या कंटेनरमधून ग्लेन फार्मा कंपनीचा माल भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथील गोदामात नेण्यात येत होता. या मालाची किंमत सुमारे ८ कोटी ५० लाख रुपये होती. २ ऑक्टोबर रोजी रात्री हा कंटेनर येवई नाका परिसरात आला असताना तो अडवण्यात आल्याचे चालकाने सांगितले होते. चोरट्यांनी मारहाण करून कंटेनरसह माल पळवून नेल्याचा दावा त्याने केला होता.

या घटनेनंतर कंटेनर चालक सोमनाथ पाल याने कंपनी मालकाला फोन करून अपहरण झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कंपनी मालकाने त्याला पोलिसांत तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून योगेशकुमार जैस्वार, मनीष पाल आणि शिवकुमार धुरिया यांच्यासह काही संशयितांना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान चोरीचा कंटेनर पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे लपवून ठेवल्याचे आढळले. तसेच कंटेनरमधील माल एका गोदामात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.
मात्र, तांत्रिक तपास आणि संशयितांची चौकशी करताना पोलिसांचा संशय तक्रारदार चालक सोमनाथ पाल आणि वाहक रामसिंग यादव यांच्यावर बळावला. पुढील चौकशीत त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने दरोड्याचा बनाव रचल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.






