पुणे : राज्यात सध्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या कोरड्या पडल्या असून धरण आणि तलावांमधील पाणीसाठा वेगाने खालावत आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके जळून खाक झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.या कठीण काळात शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची अग्रिम (अगोदर मिळणारी) मदत दिली जाणार आहे.

मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ आणि राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनांचे हप्ते दीर्घकाळापासून रखडले आहेत. नमो शेतकरी योजनेचे नववे आणि दहावे असे दोन हप्ते अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. या दोन हप्त्यांपोटी प्रति शेतकरी 4 हजार रुपये मिळणे बाकी असून, आता अकराव्या हप्त्याची वेळ जवळ आली आहे.

तसेच, पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा होण्याची शक्यता आहे, ज्याची सध्या प्रशासकीय पातळीवर पूर्वतयारी सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. राज्यातील 92 लाख शेतकरी या दोन्ही योजनांच्या लाभाची प्रतीक्षा करत आहेत. थकीत हप्त्यांसाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे 3700 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

आधीच दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत ‘6 हजार रुपयांचे हप्ते थकवून दिवाळीत 5 हजार रुपयांची मदत देणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच आहे,’ असा संताप शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. ही अग्रिम मदत आणि रखडलेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमका कधी जमा होणार, याबाबत अजूनही अनिश्चितता कायम असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढली आहे.






