पुणे : राज्यातून मोसमी पावसाने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे, बारामती, परभणी आणि ब्रह्मपुरी या भागांतून मान्सून पूर्णपणे परतला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत उर्वरित महाराष्ट्रातूनही तो माघारी फिरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा मान्सून सरासरी वेळेच्या दोन दिवस आधीच माघारी फिरला आहे.

पावसाच्या मोठ्या तुटीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ प्रभावामुळे जूनमध्ये उशिरा आलेल्या पावसाने खरीप हंगाम पुरता वाया घालवला. आता रब्बी हंगामातही पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात दरवर्षी जवळपास 54 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होते. यात प्रामुख्याने 21 लाख हेक्टर हरभरा, 17 लाख हेक्टर ज्वारी, 10 लाख हेक्टर गहू तसेच मका आणि करडईचा समावेश असतो. परंतु, पुरेसा पाऊस नसल्याने सोयाबीन, कापूस, तूर या खरिपातील पिकांसह रब्बीतील पिकांचेही अतोनात नुकसान होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदा राज्यात एकूण 19 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे, तर एकट्या सप्टेंबर महिन्यात ही तूट तब्बल 52 टक्के होती. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उकाड्यात कमालीची वाढ झाली आहे. कमाल तापमान वाढल्याने नागरिकांना तीव्र उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे.

वायव्य राजस्थानमधून 19 सप्टेंबर रोजी सुरू झालेला मान्सूनचा परतीचा प्रवास आता उत्तर भारत, गुजरात आणि मध्य प्रदेश पार करत महाराष्ट्रात पोहोचला आहे. एरवी 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान माघार घेणारा पाऊस यंदा लवकर निघून गेल्यामुळे अन्नधान्य उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे







