Suicide News: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहित तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पहाडसिंगपुरा परिसरात घडली असून या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविनाथ रामकृष्ण बर्डे असे मृत तरुणाचे नाव आहे.

या घटनेबाबत मृताचा भाऊ अमोल रामकृष्ण बर्डे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ते हरीओमनगर, जटवाडा रोड, हर्सूल येथे राहतात. तक्रारीनुसार, 9 फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे 1.45 वाजता रविनाथ यांनी गुरुगणेशनगर येथील श्री साई लॉजमधील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, रविनाथ यांची पत्नी शिवानी हिला त्यांच्यावर सतत संशय होता. ते कोणाशी तरी बोलतात असा आरोप करून ती वारंवार वाद घालत असे. तसेच तिने रविनाथ यांना त्यांच्या मुलाशीही व्यवस्थित बोलू दिले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या वादामुळे आणि मानसिक तणावामुळे रविनाथ खूप त्रस्त झाले होते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

घरातील तणाव वाढत गेल्याने रविनाथ यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







