Nanded Crime : नांदेड : नांदेड शहरातील गोवर्धन घाट रस्ता परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून 17 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादातून या हत्येची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

दोघांनी त्याच्यावर वार केला
मृत तरुणाचे नाव कमलप्रीत सिंग असे असून तो गोवर्धन घाट भागात राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे 4:30 वाजण्याच्या सुमारास कमलप्रीत हा गोवर्धन घाट पुलाजवळून जात असताना दोन तरुणांनी त्याला अडवले. सुरुवातीला त्याच्याशी वाद घातला आणि काही कळायच्या आतच दोघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. कमलप्रीतच्या पोटावर खोलवर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
पोलिस तपासात या हत्येमागे जुना वाद असल्याचे समोर आले आहे. आठ-दहा दिवसांपूर्वी कमलप्रीतचा काही तरुणांसोबत वाद झाला होता. त्या वादात मारहाण झाल्याची माहिती आहे. याच घटनेचा बदला घेण्यासाठी आरोपींनी कमलप्रीतवर हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत कमलप्रीतला तातडीने कौठा भागातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र पोटावर झालेल्या गंभीर जखमेमुळे त्याची प्रकृती खालावत गेली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन संशयित आरोपींची ओळख पटली असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.







