Latur Crime:: लातूर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मानदुखीची गोळी खरेदी करण्यासाठी आलेल्या एका 9 वर्षीय चिमुकलवर मेडिकल दुकानदारानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दत्ता चिमन्नशेट्टे (वय 52) असं या क्रूर आरोपी मेडिकल दुकानदाराचे नाव आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय घडलं ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी मानदुखीची गोळी घेण्यासाठी चिमन्नशेट्टे याच्या मेडिकल दुकानात गेली होती. आरोपीने चिमुकलीला ‘वरच्या खोलीत झाडून काढायचे आहे’, असे खोटे कारण सांगून मेडिकलच्या वरच्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
कृत्य केल्यानंतर आरोपीने पीडितेला पंधरा रुपये दिले. घरी परतल्यावर वडिलांनी ‘तुला फक्त 5 रुपये दिले होते, मग हे जादाचे पैसे कुठून आले?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा घाबरलेल्या चिमुकलीने दत्ता मामाने दिले असे सांगितले आणि त्यानंतर वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
घटनेचे गांभीर्य लक्षात येताच वडिलांनी तात्काळ मेडिकल गाठून आरोपीला जाब विचारला. मात्र आरोपीने ‘मी कुठे काय केले?’ असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मुलीने खोलीत झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्यावर वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्काळ घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आणि आरोपी दत्ता चिमन्नशेट्टे याला अटक केली. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी एन.व्ही. हाश्मी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, आरोपीवर पॉक्सो कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येत आहे.







