बीड : बीड पुन्हा एकदा हादरलं आहे. एका बापानेच आपल्या चार महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव घेतल्याची घटना समोर आलीये. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. चिमुकल्या मुलाचा जीव घेतल्यानंतर बापाने स्वतःलाही संपवलं आहे. ही नेमकी घटना काय आहे? जाणून घेऊया…

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाडा रामनगर गावात ही घटना घडली. नवरा बायकोच्या भांडणामुळे हा सगळा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी राहणार अमोल हौसराव सोनवणे आणि त्याची पत्नी पायल अमोल सोनवणे यांच्यात गेल्या काही दुवसांपासून वाद सुरु होते. या वादातून दोघांनी चार दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, सुदैवाने दोघंही यातून बचावले आणि उपचार झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरी परतले. दसऱ्याच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास अमोलने आपल्या चार महिन्याच्या मुलाला पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकले आणि त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन स्वतःलाही संपवलं.

धक्कादायक बाब म्हणजे अमोलचे हे दुसरे लग्न होते. त्याची पहिली बायको त्याच्या वागण्याला कंटाळून त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. त्यानंतर अमोलने पायलसोबत दुसरं लग्न केलं होत. पण अमोलच्या संशयी स्वभावामुळे दोघांमध्ये सतत भांडणे होत होती. अखेर या भांडणाने एका निष्पाप लेकराचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







