पुणे : समाज माध्यमांवरील (Pune Crime) ओळख कधी कोणाला किती महागात पडेल, हे सांगता येत नाही. अशाच प्रकारे लक्ष्मी रस्त्यावर मिठाई (Pune News) विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्याला एका महिलेच्या जाळ्यात अडकून मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनोळखी मैत्रीच्या जाळ्यात ओढून या महिलेने मिठाई विक्रेत्याकडून तब्बल एक लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वय वर्षे ४५ चे असून ते लष्कर भागात वास्तव्यास आहेत. लक्ष्मी रस्त्यावर त्यांचे मिठाई विक्रीचे दुकान आहे. समाज माध्यमातून त्यांची आरोपी महिलेबरोबर ओळख झाली. मूळची सांगली जिल्ह्यातील असलेली ही महिला हळूहळू विक्रेत्याच्या संपर्कात आली आणि त्याला धमकावून पैशांची उकळी सुरू केली.

दिनांक २५ सप्टेंबर रोजी ही महिला थेट लक्ष्मी रस्त्यावरील दुकानात आली. त्यावेळी तिने विक्रेत्याच्या कुटुंबीयांसमोर बदनामी करण्याची धमकी दिली. त्यातून गल्ल्यातील पाचशे रुपये आणि काही मिठाईचे खोके घेऊन ती निघून गेली. त्यानंतर तिने पुन्हा दुकानात येऊन धमकावले. या वेळी तिने जीवे मारण्याची धमकी देत सत्तर हजार रुपये रोख घेतले. एवढ्यावरच न थांबता पुढे या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी आणखी दोन लाख रुपये देण्याची मागणी केली.

विक्रेत्याने तिला दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले, मात्र दुकानात येण्यास तिने नकार दिला. त्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने पैसे देण्यास भाग पाडले. विक्रेत्याने भीतीपोटी तिच्या खात्यावर पंचवीस हजार रुपये ऑनलाइन वर्ग केले. मात्र, तिच्या सततच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या विक्रेत्याने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.
सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने मिठाई विक्रेत्याकडून एकूण एक लाख रुपये उकळले असून तिचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की समाज माध्यमांतून येणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या मैत्रीच्या विनंत्या स्वीकारू नयेत. अनेकदा महिलांच्या प्रोफाइलच्या आमिषाने लोकांना फसवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचे प्रकार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वीही अशाच पद्धतीने एका व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आली होती. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांनी अनोळखी लोकांच्या सापळ्यात न अडकता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.







