Crime News: छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात एका रिक्षाचालकावर मध्यरात्री हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवासी महिलेला सोडण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाला एका व्यक्तीने थांबवून वाद घालत मारहाण केली. ही घटना 20 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास सिडको उड्डाणपुलाजवळील दिपाली हॉटेल परिसरात घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

या घटनेत जखमी झालेले रिक्षाचालक सय्यद इस्माईल सय्यद सलीम (वय 31, रा. जाधववाडी, आंबेडकरनगर) हे नेहमीप्रमाणे आपल्या रिक्षातून प्रवासी वाहतूक करत होते. त्या रात्री त्यांनी जयभवानीनगर येथून एका महिला प्रवाशाला सिडको परिसरात सोडण्यासाठी आणले. महिला रिक्षातून खाली उतरताच तेथे उपस्थित असलेल्या सागर मुळे (रा. जयभवानीनगर, मुकुंदवाडी) याने रिक्षाचालकाला थांबवले. त्याने ‘माझ्या पत्नीला का घेऊन फिरतोस?’ असा प्रश्न विचारत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने रस्त्यावर पडलेला फरशीचा तुकडा उचलून रिक्षाचालकाच्या डोक्यात जोरात मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले. तसेच त्यावेळी आरोपीसोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीनेही लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर जखमी रिक्षाचालकाने तातडीने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी सागर मुळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी रिक्षाचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






