पुणे: पवित्र रमजान महिन्यानिमित्त कोंढवा परिसरात (Pune Traffic Diversion) सायंकाळच्या वेळी होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. रोज इफ्तारच्या वेळी खाद्यपदार्थ, फळे आणि इतर वस्तू खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सायंकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे विशेष निर्बंध लागू राहणार आहेत. रमजान महिना संपेपर्यंत ही नवी नियमावली कायम राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Latest Marathi News)

रमजानच्या काळात उपवास (रोजा) सोडण्यासाठी कोंढव्यातील शीतल पेट्रोल पंप चौक, कौसरबाग आणि पारगेनगर परिसरात मोठी वर्दळ असते. अरुंद रस्ते आणि वाढती वाहनांची संख्या यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही उपाययोजना केली आहे. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी स्थानिक स्वयंसेवकही तैनात करण्यात येणार आहेत.
कौसरबाग परिसरातील ज्योती हॉटेल चौक ते मेफेअर सोसायटी आणि पारगेनगर या मार्गावर सर्व प्रकारच्या जड वाहनांना (टँकर, ट्रक आदी) पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. तसेच सर्वोदय चौकातून कौसरबागेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही जड वाहनांना प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे या भागात सायंकाळच्या वेळी होणारी गर्दी काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
जड वाहनांसाठी मेफेअर सोसायटी चौक ते ज्योती हॉटेल चौक असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. इतर लहान वाहनांनी ज्योती हॉटेल चौक, शीतल पेट्रोल पंप चौक आणि पारगेनगर या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडिंग आणि अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे.
वाहतूक पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. “रमजान हा पवित्र महिना असून नागरिकांनी संयम राखत नियमांचे पालन करावे. पर्यायी मार्गांचा अवलंब केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. गर्दीच्या काळात अनावश्यक वाहनतळ टाळणे, रस्त्यावर दुहेरी पार्किंग न करणे आणि स्वयंसेवक व पोलिसांच्या सूचनांचे पालन करणे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






