Crime News: जालना : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका 28 वर्षीय पुजाऱ्याने एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. निलेश निशिकांत कुलकर्णी असे या आरोपी पुजाऱ्याचे नाव असून त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून या मुलाला आपल्या घरी बोलावून घेतले होते. या प्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 18 जानेवारी 2026 रोजी घडली. पीडित मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळत असताना आरोपीने त्यांना चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले. मुले खोलीत गेल्यानंतर आरोपीने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि मुलांशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. त्याने पीडित मुलावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असा इशारा देऊन त्याने मुलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र घाबरलेल्या मुलाने घरी गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. आपल्या मुलासोबत झालेला हा गैरप्रकार ऐकून पालकांनी विलंब न लावता घनसावंगी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत आरोपी निलेश कुलकर्णी याला अटक केली.
पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक ए. के. ढाकणे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून गावात या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे.


