अक्षय टेमगिरे

Shirur: शिरूर : पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील एस. एन. चौकाजवळ पुणे-अहिल्यानगर रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, वाढती वाहतूक कोंडी आणि अनधिकृत जाहिरातींमुळे नागरिक, कामगार व वाहनचालक त्रस्त झाले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आम्हाला खड्डे दिसतात, प्रशासनाला दिसत नाहीत का? अजून किती अपघात झाल्यावर जाग येणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या दोन्ही प्रमुख प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक, कामगार, प्रवासी तसेच वाहतूकदारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दररोज हजारो वाहनांची ये-जा असलेल्या या मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.
औद्योगिक वसाहतीत मोठ्या कंपन्या कार्यरत असल्याने अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. मात्र, रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून अनेक वाहनांचे नुकसान होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
एमआयडीसी चौकात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न
रांजणगाव एमआयडीसी परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना तासन्तास खोळंबा सहन करावा लागत आहे. विशेषतः एमआयडीसी चौकात वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर, जाहिराती व फलकांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होत असून वाहतूक व्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाकडे कारवाईची मागणी
रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ते सुरक्षित करावेत, वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच अनधिकृत जाहिराती हटवाव्यात, अशी मागणी स्थानिक उद्योजक अमोल चिखले, शेतकरी भरत खेडकर, अर्जुन शेळके आणि सोमेश्वर देवस्थान अध्यक्ष अभिषेक शेळके यांनी केली आहे.
प्रशासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. वाढत्या समस्यांमुळे औद्योगिक क्षेत्रातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.






