बीड: बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव–अहिल्यानगर मार्गावर बुधवारी उशिरा रात्री शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 10 ते 15 जणांच्या टोळक्याने खाडे यांच्या गाडीला अडवून लाठ्या, दगड, तलवारी आणि धारदार शस्त्रांनी अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून हल्ला केल्यामुळे त्यांची ओळख पटलेली नाही. (Attack On Ram Khade)

हल्लेखोरांकडून वाहनाची तोडफोड
खाडे हे मांदळी गावातून नगरकडे निघाले असताना हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. गाडीवर जोरदार दगडफेक करून साईड मिरर फोडण्यात आले. त्यानंतर धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांनी हातावर काही वार झेलून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेत त्यांचे तीन सहकारीही गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा: मित्रांना गॅलरीतून आवाज देत होता अचानक हात सटकला अन् थेट खाली, घटनेने परिसरात खळबळ
खाडे यांची प्रकृती चिंताजनक
अधिक माहिती अशी की, अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात खाडे यांच्यावर सुरुवातीचे उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांची शुद्ध हरपली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तत्काळ पुण्यात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, हा हल्ला राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला आहे. खाडे यांनी स्थानिक भ्रष्टाचाराविरोधात केलेल्या तक्रारींमुळेच हा प्राणघातक हल्ला घडवून आणल्याचा आरोप त्यांनी करत, हल्लेखोरांसह सुत्रधारांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.







