नांदेड: नांदेडमधील एका धक्कादायक ऑनर किलिंगच्या घटनेने मागील वर्षी २५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र हादरून गेला होता. १९ वर्षीय सक्षम ताटेची त्याच्या प्रेयसीच्या नातेवाईकांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. या घटनेनंतर सक्षमची प्रेयसी आंचलने त्याच्या मृतदेहाशी विवाह करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सक्षमच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी आणि आपण सक्षमच्या घरीच सून म्हणून राहणार, असा निश्चय तिने केला होता. मात्र, आता या प्रकरणाला एक अनपेक्षित वळण लागले असून आंचलने सक्षमचे घर सोडले आहे.

सक्षमची आई आणि आंचल यांच्यात आता आरोपा-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. सक्षमच्या आईचा दावा असा आहे की, आंचलने आजीच्या आजारपणाचे कारण देऊन घर सोडले. एवढेच नाही तर, सक्षमच्या हत्येनंतर आणि आता आंचलच्या अशा वागण्यामुळे धक्का बसून सक्षमच्या वडिलांचा मृत्यू झाला, असेही त्यांनी म्हटले आहे.

मात्र, आंचलने हे सर्व आरोप साफ फेटाळून लावले आहेत. आंचलने सक्षमच्या भावावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. तिचे म्हणणे आहे की, ती प्रामाणिकपणे त्या घरी राहण्याचा प्रयत्न करत होती, परंतु तिथे तिला सुरक्षित वाटत नव्हते. सक्षमचा भाऊ तिच्याशी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत होता आणि त्याचे वागणे संशयास्पद होते. या त्रासाबाबत तिने घरातील मोठ्या व्यक्तींना वारंवार सांगितले, परंतु कोणीही तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही.
तिने पुढे सांगितले की, जेव्हा परिस्थिती असह्य झाली, तेव्हाच तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या उपस्थितीतच ती सुरक्षितरीत्या आपल्या घरी आली आहे. आपण सज्ञान असल्याने स्वतःचे निर्णय घेऊ शकतो, असे सांगत तिने कुटुंबाचा कोणताही दबाव नव्हता, असे स्पष्ट केले. या नव्या खुलाशांमुळे नांदेडमधील हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, सत्य नेमके काय, हा प्रश्न आता समोर आला आहे.







