राहुलकुमार अवचट

यवत: जमिनीचे कागदपत्रे आम्हाला दे, असे म्हणत महिलेला घरात घुसून मारहाण करण्यात आली. याबाबत सीमा ज्ञानदेव फडके या महिलेने यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. दि. 29 जुलै रोजी रात्री 11 च्या सुमारास हातवळण येथे रेखा मोहन मोरे व कविता गायकवाड यांनी घरात घुसून “जमिनीचे ओरिजनल कागदपत्रे आम्हाला दे, तुला लय माज आला आहे का?” असे म्हणत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपींबरोबर असलेल्या चार अनोळखी महिलांनी “आज हिला जिवंत सोडायचे नाही” असे म्हणत धक्काबुक्की केली.

यावेळी कविता गायकवाड हिने गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेतले, तर अनिल बापूराव इथापे याने गालावर चापट मारत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी “तुम्ही नवरा-बायकोने शेतात पाय पण ठेवला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली असल्याची तक्रार यवत पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे.
यावरून रेखा मोहन मोरे (रा. न्हावरा, ता. शिरूर, जि. पुणे), कविता गायकवाड (रा. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे), अनिल बापूराव इथापे (पत्ता माहित नाही), इतर चार अनोळखी महिला व एक अनोळखी पुरुष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत हे करत आहेत.







