छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहितेला लग्नानंतर मानसिक त्रास दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नापूर्वीच्या ओळखीचा गैरफायदा घेत एका तरुणाने महिलेचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. तसेच तिच्या आईलाही धमकावल्याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान बाळासाहेब नाईकवाडे (रा. श्रीरामनगर, शिर्डी, जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित महिला सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पती आणि सासरच्या कुटुंबासोबत राहते.

तक्रारीनुसार, लग्नापूर्वी तिची आरोपीशी ओळख होती. त्या काळात दोघांनी काही फोटो काढले होते. ११ जून रोजी महिलेचे लग्न झाल्यानंतर ती सासरी राहत होती. मात्र, काही दिवसांतच आरोपीने तिचा पाठलाग आणि मानसिक छळ सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
४ जुलै रोजी महिलेच्या पतीला त्याच्या बहिणीचा फोन आला. इंस्टाग्रामवर पत्नीचे एका तरुणासोबतचे फोटो पोस्ट करण्यात आल्याची माहिती तिने दिली. त्यानंतर हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास आला.
याचदरम्यान आरोपीने महिलेच्या आईच्या घरी जाऊन मुलीला भेटण्याची मागणी केली. ती भेटली नाही तर स्वतःच्या जीवाचे बरे-वाईट करून घेईन, अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सततचा मानसिक त्रास आणि सोशल मीडियावरील बदनामीला कंटाळून संबंधित विवाहितेने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.







