पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता लवकरच मिटणार आहे.शासनाच्या अंदाजानुसार 5 जुलैनंतर लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होऊ शकते.

विधानसभेत कृषी विभागाच्या पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी असे सांगितले की, शासनाकडून आवश्यक प्रशासकीय कामे पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा केली जाणार आहे.या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान राज्यपालांची अंतिम मान्यता मिळताच संबंधित विभागाकडून निधी वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाईल. या योजनेचा लाभ फक्त शासनाने ठरवलेल्या अटी आणि निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. लाभ वाटपात पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले असून सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतरच रक्कम वितरित केली जाणार आहे.
विधानसभेतील चर्चेदरम्यान विविध सदस्यांनी कर्जमाफीच्या नियमांबाबत काही सूचना मांडल्या होत्या. या सूचनांचा सकारात्मक विचार सुरू असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत योजनेतील काही मुद्द्यांवर चर्चा झाली असून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन निर्णय घेतले जात असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर आयडी’ महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांच्यासाठी गावागावांत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे सर्व पात्र शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.शासनाच्या या हालचालीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनीं लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, फार्मर आयडी नोंदणी आणि इतर पात्रता निकष वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सूचनांकडे लक्ष ठेवून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.







