मुंबई: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी काळजीत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) आपल्या विजयाचा दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झालेल्या टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भारतीय संघाने 7 फेब्रुवारी रोजी आपला पहिला सामना मोठ्या दिमाखात खेळला. या सामन्यानंतर अभिषेक शर्माला अचानक अस्वस्थ वाटू लागले. सुरुवातीला हा सामान्य थकवा वाटत होता, परंतु नंतर त्याला तीव्र ताप आला. प्राथमिक तपासणीनंतर, अभिषेकला पोटाचा गंभीर संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
अभिषेक शर्मा सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. डाव्या हाताचा हा स्फोटक फलंदाज पॉवरप्लेमध्ये आपल्या खेळीने अनेकांना चकित करतो. भारताच्या टीममधला तो एक मुख्य आधारस्तंभ आहे. 12 फेब्रुवारीला होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारताला आपली विजयी घौडदौड कायम राखायची आहे. अशा वेळी ऐन सामन्याच्या तोंडावर अभिषेक रुग्णालयात दाखल होणे म्हणजे संघासाठी चिंतेची बाब आहे.







