मुंबई: टी-20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) चा बिगुल वाजला असून, घरच्या मैदानावर भारताने विजयाने श्रीगणेशा केला आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघ एका क्षणी पराभवाच्या छायेत होता, पण कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘कॅप्टन्स इनिंग’ आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे भारताने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला.

भारतासाठी या सामन्याची सुरुवात एखाद्या वाईट स्वप्नासारखी झाली होती. अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली सलामीवीर अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाला, शेंडली वॅन शाल्क्विकने एकाच षटकात तीन विकेट्स घेत भारताची अवस्था 4 बाद 46 अशी केली. रिंकू आणि हार्दिकही अपयशी ठरल्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अमेरिकेसारख्या नवख्या संघाकडून टीम इंडिया हरणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती.
दरम्यान, कठीण प्रसंगी कर्णधार सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत 84 धावांची जी खेळी केली, तीच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली. विशेषतः शेवटच्या षटकात त्याने केलेल्या 21 धावांच्या फटकेबाजीमुळे भारताला 161 धावांपर्यंत मजल मारता आली. हे लक्ष्य वानखेडेच्या खेळपट्टीवर आव्हानात्मक होते.
162 धावांचा पाठलाग करताना अमेरिकेने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या खेळाडूंना झटपट बाद केले. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी सुरुवातीलाच अमेरिकेचे कंबरडे मोडले. मधल्या षटकांत अक्षर पटेलने लागोपाठ दोन चेंडूंवर दोन बळी घेत अमेरिकेच्या आशा संपुष्टात आणल्या. अमेरिकेला 20 षटकांत 8 बाद 132 धावांपर्यंतच मजल मारता आली.







