लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील जलतरण कोच सिद्धार्थ गर्ग यांनी चमकदार कामगिरी करत स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडिया, हरियाणा स्वीमिंग आसोसिएशन तर्फे आयोजित 18 व्या राष्ट्रीय मास्टरस् जलतरण चॅम्पियंशीप स्पर्धेत चार पदक आपल्या नावे केले आहे. यात दोन रौप्य तर दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धा वॉर मेमोरियल स्टेडियम अंबाला हरियाणा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या देशातून स्पर्धेत 700 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कोच सिद्धार्थ गर्ग यांनी 200 मीटर वैयक्तिक मिडले आणि 200 मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. गर्ग यांनी वैयक्तिक 200 मिडले स्पर्धा 2.42 मिनिटात पूर्ण केली. तसेच 100 मीटर बटरफ्लाय आणि 400 मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्य पदकावर आपले नाव कोरले. सिद्धार्थ गर्ग हे राष्ट्रीय क्रीडा संस्था पटियालाचे प्रमाणित जलतरण कोच आहेत.
कोच सिद्धार्थ गर्ग यांच्या चमकदार कामगिरीबद्दल एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. सुनिता मंगेश कराड, क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड, डॉ. रामचंद्र पुजेरी यांनी अभिनंदन केले.