पुणे: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये (IND vs PAK) आज क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. पुरुषांच्या T20 क्रिकेटमधील या सामन्यात दोन्ही संघ सुवर्णपदकासाठी मैदानात उतरणार आहेत. हा सामना शनिवार, 3 ऑक्टोबर रोजी जपानमधील निस्शिन येथील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा 124 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. भारताने प्रथम फलंदाजी करत 169 धावा केल्या. ईशान किशनने नाबाद 80 धावांची खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीने 38 धावा करत महत्त्वाचे योगदान दिले. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहच्या सुरुवातीच्या विकेट्सनंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या 45 धावांवर गुंडाळला.

दुसरीकडे, पाकिस्तानने बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुवर्णपदकासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट लढत होणार आहे. पाकिस्तान पहिल्यांदाच या स्पर्धेच्या पुरुष क्रिकेटच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

कुठे आणि कधी पाहता येणार सामना?
भारत-पाकिस्तान अंतिम सामना 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. DD स्पोर्ट्सवर सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि ऑनलाइन स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना या महामुकाबल्याचे लाइव्ह अपडेट्सही पाहता येणार आहेत.
दोन्ही संघांचे खेळाडू
भारताचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे आहे. संघात वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, अक्षर पटेल, तिलक वर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, यश ठाकूर आणि विप्रज निगम यांचा समावेश आहे.
पाकिस्तानचे नेतृत्व साहिबजादा फरहानकडे आहे. त्यांच्या संघात माज सदाकत, उस्मान खान, सैम अयुब, हसन नवाज, अब्दुल समद, अराफात मिन्हास, अहमद दानियाल, मोहम्मद वसीम ज्युनिअर, अबरार अहमद, सुफियान मोकीम, साद मसूद, अली रझा, आकिफ जावेद आणि हैदर अली यांचा समावेश आहे.






