बारामती (पुणे): परदेशी व्यापारात पैसे गुंतवल्यास दरमहा 22 टक्के परतावा मिळेल, असे सांगून नागरिकांकडून मोठी रक्कम जमा केल्याचा प्रकार बारामतीत समोर आला आहे. या प्रकरणात सुमारे 63 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून बारामती शहर पोलीस ठाण्यात 5 जणांसह काही एजंटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी करण राजेंद्र मोरे (वय 37, रा. फलटण, सध्या नवी मुंबई) यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, SPVS Group of Trading Company मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, तसेच दर महिन्याला 22 टक्के परतावा दिला जाईल, असे आरोपींकडून सांगण्यात होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून करण मोरे आणि त्यांच्या पत्नीने वेगवेगळ्या वेळी 48 लाख 41 हजार रुपये गुंतवल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, प्रियंका गवळी यांनी 2 लाख 61 हजार रुपये आणि नितीश फुलंब्रीकर यांनी 12 लाख रुपये गुंतवल्याचेही सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण रक्कम सुमारे 63 लाख रुपयांवर गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

मात्र, ठरल्याप्रमाणे गुंतवणुकीवरील परतावा मिळाला नाही. तसेच गुंतवलेली मूळ रक्कमही परत करण्यात आली नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. पैसे परत मागण्यासाठी संपर्क साधल्यानंतर आपल्याला कथितरित्या पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी मदन जहांगीर पाडवी, वंदनादेवी मदन पाडवी, अक्षय महादेव अहिवळे, सचिन बाळासाहेब डोंगरे आणि अक्षय गोमासे यांच्यासह इतर एजंटांविरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती शहर पोलीस आता गुंतवणुकीचे व्यवहार, संबंधित कागदपत्रे, पैशांचा प्रवाह आणि आरोपींच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. या प्रकरणातील आरोप तपासाधीन असून न्यायालयीन प्रक्रियेत ते अद्याप सिद्ध झालेले नाहीत.






