IND vs NZ T20 : नागपूरच्या मैदानावर भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करत प्रेक्षकांना जबरदस्त मनोरंजन दिलं, आणि या खेळीचा केंद्रबिंदू ठरला तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीतील अव्वल फलंदाज अभिषेक शर्मा. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेकने अवघ्या २२ चेंडूंत अर्धशतक झळकावत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव आणला.

न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. सलामीला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन मैदानात उतरले. पहिल्याच षटकात अभिषेकने आपला इरादा स्पष्ट केला. जेकब डफीच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ठोकलेला उत्तुंग षटकार हा येणाऱ्या वादळाचा इशारा होता. मात्र दुसऱ्याच षटकात संजू सॅमसन बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. काइल जॅमिसनच्या चेंडूवर रचिन रविंद्रकडे झेल देत संजू माघारी परतला.

यानंतर बराच काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा इशान किशन क्रीजवर आला. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून त्याने आशा निर्माण केली, पण ही खेळी फार काळ टिकली नाही. डफीच्या गोलंदाजीवर मार्क चॅपमनकडे झेल देत इशान बाद झाला. भारताच्या दोन झटके पडले असले तरी दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्माचा धडाका सुरूच होता.
अभिषेकने पॉवरप्लेमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी करत अवघ्या पाच षटकांत भारताला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पॉवरप्लेनंतर भारताची धावसंख्या २ बाद ६८ अशी होती. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेकला चांगली साथ दिली. दोघांनी मिळून न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर वर्चस्व गाजवलं आणि १० षटकांत भारताला ११७ धावांपर्यंत पोहोचवलं.
या टप्प्यावर अभिषेक शर्मा ६० धावांवर खेळत होता, तर सूर्यकुमार यादव ३१ धावांवर बाद झाला. अवघ्या काही सामन्यांत टी-२० संघाचा कणा बनलेल्या अभिषेकची ही खेळी केवळ आकड्यांपुरती मर्यादित नव्हती, तर ती भारताच्या आक्रमक टी-२० दृष्टिकोनाचं प्रतीक ठरली. मालिकेच्या पहिल्याच सामन्यात दिलेला हा इशारा न्यूझीलंडसाठी पुढील सामन्यांमध्ये नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे.







